सा.युवा मुस्लिम विकास परिषद

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

 नियोजन समितीचा मंजूर निधी व्यपगत होणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावा-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर: जिल्हा वार्षिक योजना सन 2019- 20 सर्वसाधारण योजनेअंतर्गत 232 कोटीचा निधी मंजूर असून 126 कोटी 18 लाख 65 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या असून त्यातील 84 कोटी 46 लाख 13 हजाराचा निधी वितरीत केलेला आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनी 80 कोटी 49 लाखाचा निधी विकासकामांवर खर्च केलेला आहे. तरी सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना 2019-20 अंतर्गत विकास निधीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसने, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रियंका बोकील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, ज्या विभागांनी मंजूर निधी अंतर्गत च्या विकास कामासाठी प्रशासकीय मान्यता घेतलेली नाही त्या विभागांनी त्वरीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. जर संबंधित विभागाचे कामे होणार नसतील तर निधी समर्पित करण्याबाबत तात्काळ नियोजन समितीला कळवावे म्हणजे अतिरिक्त निधी इतर मागणी असलेल्या विभागांना देण्यात येईल. तसेच कोणत्याही कारणास्तव मंजूर निधी व्यपगत होणार नाही याची खात्री संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

कृषी विभागाने सिमेंट नाला बांध हे लघु पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करावेत व त्याबाबतचे दुरुस्ती ही लघु पाटबंधारे विभागाने करावी व कृषी विभागाने कृषी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील ज्या गावांना समशानभूमी नाहीत त्या गावात स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध नसेल तर थेट जमीन खरेदी करण्याबाबतचे व्यवहार त्वरित पूर्ण करावेत व जन सुविधेसाठी देण्यात आलेले विशेष अनुदान खर्च करावे अशी सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केली. परंतु संबंधित गावांना समशानभूमी त्वरित उपलब्ध करण्याची कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देशित केले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठी आवश्यक विज जोडणी साठी वीज वितरण कंपनीला उपकेंद्र निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी वीज वितरण कंपनीने त्याठिकाणी उपकेंद्र उभारून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला तात्काळ वीज पुरवठा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. तसेच कोणत्याही शासकीय यंत्रणांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव दिले असतील तर ते प्रस्ताव महाऊर्जा कार्यालय मार्फतच आले पाहिजेत, याबाबत योग्य ती दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.

विकास कामे प्रस्तावित करताना व मंजूर झालेली कामे प्रत्यक्ष करत असताना सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते कामे पूर्ण करून घ्यावेत व शासकीय योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत 100% पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग व सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. कुंटला यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2019 20 सर्वसाधारण योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा समितीसमोर सादर केला. तसेच यावेळी विशेष घटक योजनेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.

23 जानेवारी रोजी बैठक:-
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक 23 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागाशी संबंधित सविस्तर माहितीसह या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे.

आवेश सिद्दीकी जिला ब्यूरो चीफ धुले महाराष्ट्र

Don`t copy text!